वसई पूर्वेतील परिसरात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत जीन्स वॉशिंग, टेक्सटाईल, फॅब्रिक कलरिंग असे विविध प्रकारचे कारखाने आहेत. मात्र या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करताच नदी-नाल्यात सोडले जात असल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वसई व नालासोपारा पूर्वेतील परिसर हा औद्योगिक वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जातो. यात प्रामुख्याने सातिवली, गोखिवरे, गावराई पाडा, वालीव, चिंचोटी, पेल्हार, धानीव, कामण व सागपाडा या ठिकाणांचा समावेश होतो. वसईमध्ये लघुद्योग, मध्यम स्वरूपाचे कारखाने आणि अनेक मोठ्या कंपन्यांचे उत्पादन प्लांट आहेत. तर जीन्स वॉशिंग, फॅब्रिक कलारिंग, स्टील बम्पिंग, डिटरजंट, सॉल्व्हेंट्स, पेंट्स आणि औद्योगिक सिड निर्मिती करणारे 700 च्या आसपास कारखाने या भागात स्थित आहेत. दरम्यान, सातिवली येथील फॅब्रिक पेंटिंग व जीन्स वॉशिंग कंपन्यांकडून कारखान्यातील रसायनयुक्त पाणी थेट नदी नाल्यात सोडले जाते. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे अनेकदा नागरी वसाहतीत दुर्गंधीदेखील पसरते. याबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसई तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी दिली आहे.

कारखाने सुरू करताना चालकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यात आवाजाची पातळी नियंत्रणात ठेवणे, रसायनयुक्त सांडपाणी थेट नदी व नाल्यात न सोडता त्यांच्यावर प्रक्रिया करून ते सोडणे, यासाठी कारखान्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, तसेच वायू प्रदूषण रोखण्यासाठी कारखान्यावर उंच चिमणी उभारणे व एअर फिल्टर्स बसवणे व धूर मानवी वस्तीपासून दूर उंचावर सोडणे या नियमांचा समावेश आहे. मात्र वसईतील औद्योगिक वसाहतीत कार्यरत असणार्या बहुतांश कंपन्या या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच अनेक कारखान्यांवर धूर निघून जावा यासाठी लावण्यात आलेल्या चिमण्या अतिशय कमी उंचीवर असून यामुळे कारखान्यातून निघणारा धूर रस्त्यावर व नागरी वस्त्यांमध्ये व गावांमध्ये शिरतो. यामुळे रहिवाशांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार अशा आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. दरम्यान, वसईतील तुंगारेश्वर अभयारण्य हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या भागात औद्योगिक वसाहती उभारण्यास बंदी आहे. मात्र अलीकडच्या काळात अभयारण्याच्या आसपासच्या परिसरात काही कारखाने उभारण्यात आले आहेत. तर या कारखान्यातून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी व धुरामुळे अभयारण्यात येईल जैवविविधतेल धोका निर्माण झाला असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली आहे.




Leave a comment